टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार अव्वलस्थानी

suryakumar

विराट, केएल आणि अर्शदीप सिंगचे प्रमोशन

| मुंबई । वृत्तसंस्था ।

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतीच फलंदाजी आणि गोलंदाजीची क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ‘मिस्टर 360’ सूर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले, तर दुसर्‍या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. सर्वात आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे आता सूर्या आणि रिझवानमध्ये 39 गुणांचा फरक आहे. याचा अर्थ आता रिजवानसाठी सूर्याला हरवून मागे टाकणे खूप कठीण जाणार आहे.

सूर्यकुमार याच्याबरोबर भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उपकर्णधार केएल राहुल यांना क्रमवारीत फायदा झाला आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्‍वचषक 2022च्या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याने आयसीसी टी-20 क्रमवारीत 11वे स्थान कायम राखले आहे. अर्शदीपला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने गोलंदाजीत 23वे स्थान गाठले आहे. या स्पर्धेत अर्शदीपने त्याच्या गोलंदाजींने चाहत्यांना भूरळ घातली आहे. त्याने पहिलाच टी-20 विश्‍वचषक खेळताना 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर राहुल यालाही एका स्थानाचा लाभ झाला असून तो आता 16 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो 14वरून 13व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 18व्या स्थानावर कायम आहे.

Exit mobile version