रासळ गावच्या सुशिल तेलंगेची स्वप्नपूर्ती

सुधागडचा जवान बनला युनोचा शांतता सैनिक; रायगडच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
| पाली/बेणसे | वार्ताहर |
शेतकरी कुटुंबात अत्यंत हलाखीत आई-वडीलांनी मेहनत करून आपल्या मुलाला भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी पाठवले. तो जवान भारतीय सैन्यात दाखल झाला. आता त्याच्या करिअरची 10 वर्षे पूर्ण होत असतानाच आफ्रिकेतील सुदान प्रांतात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेचा शांतता सैनिक म्हणून त्याची निवड झाल्याने त्याने 2017 साली पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले आहे. तो जवान आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ या गावचा सुशिल कृष्णा तेलंगे. पंखांना संस्काराचे , शिक्षणाचे बळ मिळाले की फिनिक्स पक्षी राखेतून झेप घेतो, हे आज सुशीलने दाखवून दिले.

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रासळ, रामनगर मधील व कृष्णा विठ्ठल तेलंगे व सुलभा कृष्णा तेलंगे यांचे सुपुत्र सुशील कृष्णा तेलंगे यांना बारावी पास नंतर 2013 साली विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिकत असताना भारतीय सैन्य दलाची ओढ लागली. आई-वडीलांसोबत चार बहिणींच्या पाठी एकटा भाऊ. त्यात घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही आपल्या ध्येयाशी ठाम राहून घरच्यांच्या पाठिंब्याने जिद्द करून सैन्य दलात भरती झालेला सुशिल ट्रेनिंग घेत असताना खर्चाच्या बाबतीत वडिलांच्या आणि बहिणींच्या मदतीने पुढे जात राहिला. प्रशिक्षणानंतर (एचए) इलेक्ट्रिक मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून निवड झाली आणि नोकरीत कार्यरत असताना पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो सैन्यदलात दाखल झाला. त्याची दहा वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. वयाच्या 29 व्या वर्षी आफ्रिका ,सुदान देशात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये शांतता सैनिक म्हणून निवड झाली आहे.

सुशिलने 2017 साली पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले. आज कुटुंबात आई ,वडील, पत्नी आणी एक मुलगा असा परिवार आहे. चारही बहिणींची लग्न होऊन त्यातील दोन बहिणी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून सेवेचे काम करतात. तसेच तो इलेक्ट्रिक मॅकेनिकल इंजिनीअर असल्याने सैन्य दलाची सेवा पूर्ण झाल्यावर एखादा कारखाना उभा करून चार कुटुंबाना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुशिलने सांगितले.

Exit mobile version