हॉटेलच्या टेबलावर नाचणार्‍यांना वरातीत नाचायला बोलवा

सुषमा अंधारेंची आ. महेंद्र थोरवे यांच्यावर टीका

माथेरान | वार्ताहर |

ज्यांनी आपल्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यात पाणी आणले हेच ते गद्दार जे हॉटेलच्या टेबलावर चढून नाचतात, यांना वरातीतसुद्धा नाचायला बोलवा, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त कर्जत येथे आयोजित शिव-संवाद मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. त्यावेळी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. म्हणाल्या की, आत्ता शिवसेनेने कंबर कसली असून, आपल्याला यांच्याबरोबर लढायचे आहे.
कर्जत येथील रॉयल गार्डन आवारामध्ये शिव-संवाद मेळाव्याचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना तसेच उपजिल्हाप्रमुख तथा गटनेते कर्जत नगरपरिषद नितीन सावंत व कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने करण्यात आले होते. आणि याचवेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे,उपनेते अल्ताफ शेख, बबन पाटील, मनोहर भोईर कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, संपर्क प्रमुख सुदाम पवाळी, संघटक बाबू घारे, महिला संघटिका करुणा बेडेकर, युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे आणि तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात फुटीर चाळीस आमदारांचा समाचार घेतला. या लोकांनी पक्षप्रमुख आणि पक्षाचा विश्‍वासघात तर केलाच, परंतु त्या पलीकडे त्यांनी मतदारांचादेखील विश्‍वासघात केला आहे. अशा गद्दारांना कदापि माफ करू नये, असे आवाहन अंधारे यांनी उपस्थितांना केले. यावेळी येथील रॉयल गार्डन पटांगणात कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version