शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया संपर्कावरून एटीएस सतर्क
तिघांवर राहणार करडी नजर
| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतलेल्या तीन संशयित तरुणांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. चौकशीत कोणताही दहशतवादी कट अथवा गंभीर गुन्हेगारी संबंध आढळून आला नसला, तरी पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित सोशल मीडिया खात्यांशी संपर्क आढळल्याने सुरक्षा यंत्रणांनी या तिघांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एटीएसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील एका फार्महाऊसमधून उत्तराखंडमधील दोन तरुणांना, तर खोपोली येथून जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित सोशल मीडिया अकाऊंटशी त्यांचा संपर्क आढळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली.
तिन्ही तरुणांची एटीएसने सखोल चौकशी करून त्यांचा शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया खात्याशी संपर्क कसा आला, याचा तपशील जाणून घेतला. प्राथमिक चौकशीत कोणतीही गंभीर किंवा दहशतवादी कारवायांशी संबंधित बाब समोर आली नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. मात्र, संबंधित सोशल मीडिया अकाऊंट पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित असल्याने ही बाब सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे तिघांना मुक्त करण्यात आले असले तरी त्यांच्या हालचालींवर एटीएस आणि इतर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या सोशल मीडिया संपर्काचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून अद्याप सुरू असून, आवश्यकतेनुसार पुढील चौकशीही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एटीएसकडून प्रमुख सूचना :
सोशल मीडियावरील अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींशी संपर्क टाळा.
पालकांनी मुलांच्या सोशल मीडिया वापरावर आणि इंटरनेटवरील हालचालींवर लक्ष ठेवावे.
जलद पैसा, नोकरी किंवा आर्थिक आमिष दाखविणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका.
संशयास्पद संदेश, देशविरोधी मजकूर किंवा भडकावू पोस्ट फॉरवर्ड करू नका.
कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिस किंवा एटीएसशी संपर्क साधावा.
कोणालाही पाठीशी घालणार नाही
महाराष्ट्र पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक राज्यातील शांतता, सुरक्षितता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असून, देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,' असा इशाराही एटीएसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
