भारतीय फुटबॉल असोसिएशनचे निलंबन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफानंभारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघात तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्यानं तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफानं स्पष्ट केलं आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंगळवारी हा मुद्दा न्यायालयात मांडला. फीफानं केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळं ऑक्टोबरमध्ये होणार्‍या अंडर-17 महिला विश्‍वचषक अडचणीत आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी भारतीय फुटबॉल महासंघाचे प्रशासन हाताळण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचं माजी न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल दवे, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार भास्कर गांगुली या समितीचे सदस्य आहेत. याआधी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी जवळपास दहा वर्षे एआयएफएफवर नियंत्रण ठेवत होती. एआयएफएफमध्ये बराच काळ निवडणुका झाल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठानं स्पष्ट केले होते की, ही एक अंतरिम व्यवस्था आहे. एआयएफएफची नवीन घटना तयार झाल्यानंतर तिच्या निवडणुका होतील.

फिफाचं स्पष्टीकरण

फिफाने म्हटले की, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.

फिफा काय आहे?

जागतिक फुटबॉल संघटना अर्थात ‘फिफा’ ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ’फिफा’ हे फ्रेंचमधील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फुटबॉल असोसिएशनचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.

Exit mobile version