लाखोंचा घोटाळा करणार्‍या कुर्डुस सरपंचाचे निलंबन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जवळपास 30 लाखांचा घोटाळा करणार्‍या कुर्डुसचे सरपंच अनंत पाटील यांना आर्थिक अनियमिततेखाली दोषी ठरवत ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1) अन्वये सरपंच पदावरुन काढुन टाकण्याची कारवाई कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे.

सुनील पिंगळे यांनी याबाबत तक्रार केली होती. 14 वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीच्या नावाखाली लाखोंची रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. कॅशबुक मध्ये खाडाखोड करून व चुकीची प्रमाणके जोडून जनतेने विश्‍वासाने दिलेल्या सरपंचपदाचा गैरवापर करीत ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप सुनील पिंगळे यांनी केला होता.

विकासकामांसाठी आलेला निधी हडप करण्याचा प्रकार सरपंच आणि ग्रामसेवकाने ग्रमपंचायतीमध्ये केला असल्याने त्यांच्याविरूद्ध ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 39 (1) अन्वये प्रशासकीय कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी कोकण आयुक्तांना कळविले होते. कारवाईनंतर ही रक्कम वसूल केली जाणार आहे.
तसेच 14 वा वित्तआयोग आणि ग्रामनिधीच्या अंतर्गत कामे करताना प्रमाणक न घेणे, मंजुराचे हजेरीपत्रक कोरे ठेवणे, कॅशबुक मध्ये विकास कामांच्या नावात खाडाखोड व कॅशबुकवर खर्चाचा तपशिल आणि संबंधित प्रमाणकावरील तपशिल यांमध्ये तफावत, प्रमाणकांवर खर्चाचा संमुर्ण तपशील नमुद करून त्यावर ठेकेदाराची व सरपंचाची स्वाक्षरी न घेणे, अंदाजपत्रक न घेता मुल्यांकन दाखले घेणेे व काही कामांचे मुल्यांकन दाखले न घेणे तसेच काही कामे मंजूर करताना स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे आवश्यक असतानाही नियमांचे उल्लंघन करीत त्या प्रसिद्ध न करणे हे सर्व प्रकार करून सरपंच अनंत पाटील व ग्रामसेवक अधिकारी सुनिल म्हात्रे यांनी लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

सुनिल पिंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी चौकशी करीत आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला होता. याबाबत 24 मे 2022 रोजी व्हिडीओ कॉन्फर्सिंग द्वारे सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी सर्व कागदपत्र आणि पुरावे ग्राह्य धरुन आयुक्तांनी सरपंच अनंत पाटील यांना कर्तव्यात कसूर करुन अनियमितता केल्याचे दिसून येत असल्याचे मान्य करीत अनंत पाटील यांना सरपंच पदावरुन काढुन टाकण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबाबत तक्रारदार सुनील पिंगळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version