। लंडन । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक 2024 तोंडावर असताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपावरून तीन महिन्यांसाठी निलंबित केले आहे. 28 वर्षीय कार्स एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत इंग्लंड संघाचा भागही होता. दरम्यान, त्याच्यावर इंग्लंडच्या नव्याने स्थापन झालेल्या क्रिकेट नियामकाने भ्रष्टाचारविरोधी चौकशीनंतर ही बंदी घातली आहे. कार्सनेही हे आरोप मान्य केले आहेत आणि चौकशीसाठीही सहकार्य केले. त्याने 2017 ते 2019 दरम्यान वेगवेगळ्या सामन्यांवर 303 वेळा सट्टा लावला होता.
एका वृत्तानुसार त्याने तो खेळत असलेल्या सामन्यांवर सट्टा लावला नाही, पण त्याने त्याचा देशांतर्गत संघ डरहमच्या सामन्यांवर पैसे लावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर त्याच्यावर 16 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, ज्यातील 13 महिन्यांवर स्थगिती देण्यात आली आहे. पण तीन महिन्यांच्या निलंबनामुळे तो 28 ऑगस्टपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध होणार्या कसोटीसाठी इंग्लंड संघात निवड होऊ शकत नाही.