कर्जतमध्ये संशयास्पद मृतदेह

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीमधील धोत्रे आणि शिलारवाडी या गावांच्या मध्यभागी असलेल्या जंगलात मृतदेह आढळून आला आहे. पोलीस पाटील यांच्याकडून माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.

धोत्रे गावचे पोलीस पाटील मनोज रसाळ, शिलार गावचे पोलीस पाटील जनार्दन रनावरे यांना कर्जत पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृत इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असावे आणि 15 ते 20 दिवसांपूर्वी त्याला त्या निर्जनस्थळी आणून टाकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यावेळी घटनास्थळी मृतदेहाजवळ भगव्या रंगाचा टी शर्ट दिसून आला आहे. त्या त्यावर पुढच्या बाजूस सर्वसामान्यांचे सरकार असे लिहिलेलं आहे, तर मागच्या बाजूला मी शिवसैनिक माझा मुख्यमंत्री आणि त्यावर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांचा फोटो छापलेला आहे.

मृतदेहाजवळ प्रेताचे काही अवयव त्या ठिकाणी आढळले. ते कशेळे ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्याचे निर्जनस्थळी दफन करण्यात आले. मृतदेह हा सध्या बेवारस असून, या व्यक्तीवर हल्ला करून घातपात केला असावा, या दृष्टीने कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलीस उपनिरीक्षक वारे 9209647572 तसेच पोलीस कर्मचारी राजेंद्र थोरवे 9881652924 आणि राहुल जाधव 9004790022 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version