| मुंबई | प्रतिनिधी |
भायखळा येथील मुंबई महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृत्यू 17 नोव्हेंबरलाच झाला होता, मात्र प्राणी संग्रहालय प्रशासनाने याबाबतची माहिती दडवून ठेवली होती. अचानक अपस्माराचे झटके आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि वनस्पती उद्यान असून या ठिकाणी काही वर्षांपूर्वी आणलेल्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूची माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांना 18 नोव्हेंबरला इमेल द्वारे कळविण्यात आली. मात्र, प्राणी संग्रहायलयाने ही माहिती दडवून ठेवल्याचा आरोप होऊ लागला आहे. प्राणी संग्रहालयात प्रशासन आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर त्याची बातमी वनविभाग जाहीर करतात. मग शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसिद्ध न करण्यामागचे नेमके कारण काय ते पुढे आले पाहिजे, तसेच प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, शक्ती या वाघाने वी. जी. भो.व. उदयान व प्राणी संग्रहालय यापूर्वी कुठल्याही प्रकारच्या आजारपणाचे लक्षण दाखविले नव्हते. शक्ती वाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्याने त्याची विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्न उद्भवत नाही. शक्ती वाघाच्या अवयवांचे नमुने आम्ही वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा, नागपूर येथे ही पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांच्याकडूनही अहवाल प्रतीक्षेत आहे, अशी प्रतिक्रिया प्राणी संग्रहायलयातील अधिकाऱ्यांनी दिली.






