किहीमधील भावाबहिणीचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र होणार स्पष्ट

| अलिबाग/सोगाव | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासीवाडीमधील दोन बालकांचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 31) सायंकाळी घडली. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या भावाबहिणीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोघांच्या मृतदेहाचे मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा विसेरा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आराध्या सदानंद पोळे (6) व सार्थक सदानंद पोले (3) अशी या दोन बालकांची नावे आहेत. दोघेही त्यांच्या घरात दुुपारी जेवल्यानंतर झोपी गेले. सायंकाळचे सव्वासहा होत आले तरीही ते झोपेतून उठले नाही. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही हालचाल दिसून आली नाही. याबाबतची माहीती सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाली असता, त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या रुग्णवाहिकेतून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून ते मयत असल्याचे सांगितले.

या बालकांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी मुंबई येथील सर जे.जे. रुग्णालयात त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. सोमवार, दि. 1 एप्रिल रोजी शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले. या मुलांच्या पार्थिवावर अंतिम विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांच्या मूळगावी पुसद-यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत. या बालकांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाल्याने त्यांचा विसेरा आणि शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

Exit mobile version