। नेरळ। वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील लहान चांधई या गावातील तरुण दीपक बबन कोळंबे या २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह उल्हास नदी शेजारील पुलाजवळील आढळून आला आहे. मात्र त्या तरुणाचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यात तरुणाच्या दुचाकी अपघाताची नोंद झाली असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कर्जत तालुक्यातील चांधई खुर्द येथील राहणारे दिपक बबन कोळंबे हा तरुण पनवेल येथे काम करतो. सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता त्या तरुणाने आपल्या मोबाईल फोन वरून घरी फोन करीत पाच मिनिटात घरी येतो, पाणी गरम करून ठेव असा निरोप दिला. त्यानंतर १५ मिनिटांच्या अंतराने त्या तरुणाचा मोबाईल फोन स्वीच ऑफ असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर त्या तरुणाच्या घराच्या मंडळींनी शोधाशोध सुरु केली. मात्र रात्री उशिरा पर्यंत दीपक बबन कोळंबे या तरुणाचा शोध घेऊन देखील शोध लागला नव्हता. आठ फेब्रुवारी रोजी दुपारी चिंचवली – कडाव या रस्त्यावर उल्हासनदी शेजारील नवीन पुलाजवळील वळणावर एक दुभाई अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. त्याठिकाणी चांदई गावातील अनेक ग्रामसर्थ पोहचले असता उल्हासनदी वरील पुलाच्याजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला झाडी मध्ये दीपक बबन कोळंबे या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तेथे पोहचले. पोलीस उपाधीक्षक विजय लगारे,नेरळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, कर्जतचे पोलीस निरीक्षक के डी कोल्हे, यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली. त्यानंतर यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलिस रुपेश म्हात्रे, पी एस आय शिंदे, पोलीस हवालदार थळकर,देशमुख, पोलीस हवालदार निलेश वाणी,बारगजे,नरुटे म्हात्रे,दुसाने आणि पोलीस नाईक नागरगोजे यांनी पंचनामा करून शव विच्छेदन साठी मृतदेह नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. दीपक बबन कोळंबे या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपासात जे निष्पन्न होईल त्यावर पुढील कारवाई नेरळ पोलीस ठाणे करीत आहे.