कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांची तक्रार दाखल
भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत दिले निवेदन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या दहा वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायत हद्दीत सन 2015 ते 2026 या कालावधीत विविध विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून रस्ते, बांधकामे, पाणीपुरवठा, गटारे तसेच इतर मूलभूत सुविधांची कामे करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर अनेक कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळल्याचा दावा सचिन पाटील यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, अनेक कामे कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ती अपूर्ण किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी कामे न करताच बनावट बिले, मोजमाप पुस्तके आणि नोंदी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच लाभार्थी योजनांमध्ये अपात्र व्यक्तींना लाभ देणे, ग्रामसभा न घेता निर्णय घेणे, कामांची माहिती जाणीवपूर्वक लपविणे अशा गंभीर प्रकारांचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया गेले असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात ग्रामसेवक, सरपंच, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, या तक्रारीमुळे कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा परिषद प्रशासनाकडून लवकरच चौकशी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version