। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी आणि अन्य परिसरामध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी प्रमाणावर दिसत आहे. कोलाड-रोहा येथे आपल्या शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक सातत्याने जात असतात. परंतु, गेल्या आठवड्यापासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तसेच शहरात पूर सदृश्य स्थितीमुळे अनेकांनी घरी राहणे पसंत केले आहे. सुतारवाडी नाक्यावर बँकेची व्यवस्था नसल्यामुळे बँकेतून पैसे काढणे किंवा इतर कामासाठी कोलाड किंवा रोहा येथे जावे लागत आहे. मात्र, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच काम ठप्प झाली आहेत.
पावसाने जून महिन्यापासूनच हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने वेळीच लावणीची कामे उरकली होती. मात्र, काहींच्या शेतात थोड्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे फिरते भाजी विक्रेते, मासळी विक्रेते यांच्यावर थोड्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. परिसरातील कालवे, नाले, ओढे ओसंडून वाहत असून सुतारवाडी धरण ही पाण्याने भरले आहे. ग्रामीण भागात येणाऱ्या गाड्यांचे वेळावत्रक सुद्धा विस्कळीत झाले आहे. ताम्हीणी घाटात दरड कोसळल्यामुळे रोहा आगारातून सकाळी सुटणारी रोहा- स्वारगेट सुतारवाडी मार्गे एसटी एक दिवस बंद होती. यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना या कालावधीमध्ये सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. सध्या पावसाचा जोर कमी होत चालला असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्ववत होत आहे.