| दिघी | वार्ताहर |
राज्यासह देश विदेशात प्रसिद्ध असणारे श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन व धार्मिक स्थळ दिवेआगर येथील सुवर्ण गणेशाचा प्रकट दिन सोहळा शनिवारपासून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा होत आहे. पुनःप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तीच्या यंदाच्या 25 व्या प्रकटदिनी सोहळ्यात तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी (दि.13) सायंकाळी 4 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू आणि रात्री 8 वाजता होममिनिस्टर खेळ पैठणीचा अशा कार्यक्रमाचे आयोजन आहे. तर सोमवारी (दि.14) सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि 12 वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री 10 वाजता रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आनंदी प्रस्तुत सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा या ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिवेआगरमध्ये 17 नोव्हेंबर 1997 साली संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कै. द्रौपदीबाई पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या बागेमध्ये सुवर्ण गणेश प्रकट झाले. मात्र 2014 मध्ये सुवर्ण गणेशाची मूर्ती दरोडेखोरांनी रक्तरंजित दरोडा टाकून चोरून नेली. त्यानंतर मूर्तीची पुनर्स्थापना झाल्यानंतरचा हा पहिला प्रकटदिन कार्यक्रम होत आहे. सुवर्ण गणेशाच्या आगमनाने दिवेआगर पर्यटन आता धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून वाढीस येत आहे.