जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सुयश, ज्ञानदाला अजिंक्यपद

। कर्जत । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने कर्जत तालुका बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या १७ वर्षांच्या आतील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नागोठणे-रोहा येथील मुलांच्या गटात सुयश मणचेकर, तर मुलींच्या गटात ज्ञानदा गुजराथी हिने अजिंक्यपद पटकावले. यावेळी चार स्पर्धकांची पुण्यामध्ये होणार्‍या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

कर्जत शहरातील हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष संजीव ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सचिव अंकित जोशी, डॉ. प्रथमेश अळसुंदेकर आदी उपस्थित होते. दोन्ही गटात अलिबाग, रोहा, पनवेल, उरण, कर्जत आदी तालुक्यातील एकूण पन्नास स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत मुलींच्या गटात ज्ञानदा गुजराथी हिने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक विद्याभारती धर्मेंद्रकुमार, तृतीय क्रमांक अलमीरा शेख हिने मिळविला. विशेष म्हणजे, या सर्व यशस्वी स्पर्धक कर्जत तालुक्यातील आहेत. मुलांच्या गटात नागोठणे-रोहा येथील सुयश मणचेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अलिबागच्या हिमांशू डंगर आणि तृतीय क्रमांक अलिबागच्याच आरव खेदू याने मिळवला. मुख्य पंच म्हणून सागर वाघमारे तर पंच म्हणून चैतन्य मोहिते, आयुष अभाणी, सार्थक मिंडे आणि कपिल कोळंबकर यांनी काम पाहिले.

यशस्वी स्पर्धकांना एसएसईएस विद्यालयाच्या प्रा. शबनम सय्यद आणि संजीव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अंकित जोशी, डॉ. प्रथमेश अळसुंदेकर आदी उपस्थित होते. यावेळी सय्यद यांनी सात वर्षांच्या आतील मुलांची स्पर्धासुद्धा आयोजित करावी, असे सूचित केले. मुलांच्या गटातील सुयश मणचेकर, हिमांशू डंगर तर मुलींच्या गटातील ज्ञानदा गुजराथी आणि विद्याभारती धर्मेंद्रकुमार यांची पुणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

Exit mobile version