। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागरिकांना स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्याच्या दृष्टीने स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. 1 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार असून, त्यात स्वच्छतेबाबत कुटुंब स्तरावर सर्व बाबींचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करणार्या कुटुंबांचा ग्रामपंचायतीकडून गौरव करण्यात येणार आहे. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
स्वच्छ माझे अंगण 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करताना स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन राबवीत असलेल्या राज्यातील सर्व कुटुंबस्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य-नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा, परसबाग, पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून, त्यांचा नियमितपणे वापर करतात. अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्यासाठी इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपाच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे या बाबींवर भर देण्यात येणार आहे.