गावांच्या वेशीवरच कचऱ्यांचा ढिगारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण अभियान जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वच्छता राखण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. परंतु, हे अभियानच फेल ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील गावांच्या वेशीवरच कचऱ्याचा ढिगारा अस्ताव्यस्त पडलेला असून, ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याकडे मात्र स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण 2025 हा उपक्रम रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी गाव पातळीवरील प्रशासनाला या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरु झाल्या.
केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने मान्यता दिलेल्या दिल्ली येथील अकॅडमी फॉर मॅनेजमेंट स्टडी या संस्थेमार्फत अलिबाग, रोहा, कर्जत,पेण, पनवेल, माणगाव, सुधागड, उरण, महाड, म्हसळा, खालापूरमधील गावांना भेटी देण्यात आल्या.
सर्वेक्षणामध्ये गाव पातळीवरील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, दृश्यमान स्वच्छता, ओला व सुका कचरा विलगीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, खत खड्डे, प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन, घरोघरी भेटी, शौचालयाचा नियमित वापर, कचरा व्यवस्थापनाच्या सवयींचा आढावा घेण्यात आला. शाळा, अंगणवाड्या, बाजारपेठा, धार्मिक स्थळे व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छतादेखील तपासण्यात आली. मात्र, ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा कारभार जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील गावांच्या वेशीवरच कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण अभियान जिल्ह्यात फक्त समितीला दाखविण्यापुरते झाले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.







