खालापुरात भाविक संतप्त
| खोपोली | प्रतिनिधी |
स्वामी समर्थांचा जयघोष, मठात सुरू असलेली पूजा आणि बाहेर भाविकांची तुरळक वर्दळ… याचाच फायदा घेत चोरट्यांनी मठातच हात साफ केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 2) सकाळी घडली. नव्याने बांधण्यात आलेल्या स्वामी समर्थ मठातून तब्बल 656 ग्रॅम वजनाच्या आणि सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी लंपास केल्या. चोरीची ही घटना उघडकीस येताच भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली.
पुजारी संतोष सावंत हे सकाळी सातच्या सुमारास मठात नेहमीप्रमाणे पूजा करत होते. साडेसातच्या सुमारास ते तळमजल्यावरील ध्यानधारणा मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. मठातील या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्याने क्षणाचाही विलंब न करता पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि स्वामी समर्थांच्या चांदीच्या पादुका घेऊन दुचाकीवरून पसार झाला. मठातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीचा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे. दोन चोरटे दुचाकीवरून मठाजवळ आले होते. दोघेही काही वेळ परिसरात टेहळणी करताना दिसून आले. चेहरा लपविण्यासाठी दोघांनी रुमाल बांधले होते, तर एकाने डोक्यावर टोपीही घातली होती. त्यामुळे पोलिसांसमोर आता या दोन्ही संशयितांची ओळख पटविण्याचे आव्हान आहे. पादुका चोरीला गेल्याचे समजताच भाविकांनी मठात मोठी गर्दी केली. धार्मिक स्थळातच अशा प्रकारे चोरी झाल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.
