। खोपोली । प्रतिनिधी ।
पाली- खोपोली मार्गावर मोटारसायलक व ट्रकच्या अपघातात 18 वर्षीय पूजा शिदोरे या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.4) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
नागोठणे येथील पूजा शिदोरे ही मित्र साहिल तायडे याच्यासोबत अॅडलॅब इमॅजिका येथे फिरण्यास अॅव्हेंजर मोटार सायकलवरुन जात होती. यावेळी खोपोलीजवळ आले असता समोरुन येणार्या ट्रकची जोरदार धडक लागली. यामध्ये मोटारसायकलवरील पूजा हिला गंभीर दुखापत झाली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.
पूजा बेलापूर येथील भारतीय विद्यापीठात बीबीएच शिक्षण घेत होती. ती बेलपाडा येथील वसतिगृहात राहत होती. तिचे वडील रिलायन्स टाऊनशीपमध्ये पुजारी म्हणून काम पाहतात. ही घटना समजताच संपूर्ण शिदोरे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.