पालकमंत्र्यांसह मान्यवरांचा सन्मान
| पनवेल | प्रतिनिधी |
सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने असामान्य व आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळ्याचे शुक्रवार, दि. 3 जून रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांना या पुरस्कार सोहळ्यात असामान्य लोकसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत आ. बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी. घरत, शिवसेनेचे बबन पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेनेचे रामदास शेवाळे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान होते. पनवेलच्या विरुपाक्ष हॉल येथे हा सोहळा संपन्न झाला.
कोरोना विषाणू संक्रमण काळामध्ये पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी केलेल्या अप्रतिम कार्याबद्दल त्यांचा असामान्य लोकसेवक म्हणून सन्मान करण्यात आला. पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला देण्यात आलेल्या असामान्य लोकसेवक पुरस्काराचा संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वीकार केला. कामगार चळवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारे कामगार नेते महेंद्र घरत यांना या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल, तर स्वतः अल्पशिक्षित असूनदेखील शिक्षणक्षेत्रात तब्बल बारा शिक्षण संस्थांची निर्मिती करणारे शिवसेना सल्लागार तथा प्रवक्ते बबन पाटील यांना असामान्य लोकसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. सिटी बेल वृत्त समूहाचा प्रवास आणि पुरस्कर सोहळ्याचे प्रयोजन याबाबत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर पुरस्कार प्राप्त प्रभुतींचा अल्प परिचय करून देणारा सिटी बेल विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.