अंतराळाकडे स्वराची भरारी

अलिबागच्या विद्यार्थिनीची आयआयएसटीमध्ये निवड

| चौल | प्रतिनिधी |

रायगडच्या मातीतून उंच भरारी घेत अलिबागच्या स्वरा भाग्यश्री अविनाश पाटील हिने देशातील सर्वात प्रतिष्ठित भारतीय अंतराळ विज्ञान संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी), तिरुवनंतपुरममध्ये प्रवेश मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बळावर मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

अलिबाग येथील स्वरा पाटील हिने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयआयएसटी), तिरुवनंतपुरम येथे बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच विज्ञान, गणित आणि अंतराळ संशोधनाची आवड असलेल्या स्वराला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या 100 सॅटेलाईट मिशन आणि 150 सॅटेलाईट मिशन या राष्ट्रीय उपग्रह निर्मिती मोहिमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. राज्य आदर्श शिक्षक तथा कोअर कमिटी सदस्य डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने उपग्रह तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

शालेय शिक्षणासोबत राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रकल्प, संशोधन आणि विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत तिने जेईई परीक्षेत 98.10 पर्सेंटाइल, गणितात 99.386 पर्सेंटाइल तसेच बारावी विज्ञान शाखेत 87.86 टक्के गुण मिळवले. याशिवाय 50 व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही तिने सहभाग नोंदवला. स्वराच्या या यशाबद्दल नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर, डॉ. संदीप वारगे, अमोल पोतदार तसेच आयसीडीएस अधिकारी भाग्यश्री पाटील यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्याचे माझे स्वप्न आहे. आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले. पुढेही देशासाठी योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.

स्वरा पाटील
Exit mobile version