स्वराजने रचला नवा इतिहास

धरमतर ते गेट वे अंतर पोहून केले पार

| उरण | प्रतिनिधी |

जिद्द, चिकाटी आणि अंगात असलेल्या उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज सोनाली संतोष पाटील या तरुण जलतरणपटूने अरबी समुद्रात एक नवा इतिहास रचला आहे. स्वराजने मध्यरात्री बरोबर 2 वाजता धरमतर जेटीवरून समुद्रात उडी मारून आपल्या या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली. अथांग समुद्राच्या गडद अंधारात आणि लाटांशी झुंज देत स्वराजने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 36 किलोमीटरचे अंतर केवळ 9 तास 49 मिनिटांत यशस्वीपणे पार केले.

स्वराजसाठी धरमतर ते गेट वे ही मोहीम अचानक मिळालेले यश नाही, तर त्यामागे त्याची टप्प्याटप्प्याने केलेली तयारी आहे. याआधी त्याने मोरा ते गेटवे ऑफ इंडिया‌’ हे अंतर यशस्वीपणे पोहून पार केले होते. त्यानंतर त्याने कासा खडक ते खांदेरी किल्ला या ऐतिहासिक जलमार्गावरही आपली मोहोर उमटवली होती. या लहान पण आव्हानात्मक मोहिमांमधील यशामुळेच त्याला 36 कि.मी.च्या मोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला. धरमतर ते गेट वे हा समुद्री मार्ग जलतरणपटूंसाठी अत्यंत कठीण मानला जातो. मध्यरात्री 2 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सुरुवातीचे काही तास स्वराजला पूर्णतः अंधारात पोहावे लागले. वाटेत येणारे भरती-ओहोटीचे प्रवाह, जेलीफिशचा धोका आणि मोठ्या जहाजांची वर्दळ या सर्वांवर मात करत स्वराजने सातत्य राखले. जसा स्वराज गेटवे ऑफ इंडियाच्या पायऱ्यांजवळ पोहोचला, तसा तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबियांनी जल्लोष केला.

‘आईने 25 वर्षांपूर्वी जे स्वप्न पाहिले होते, ते आज मी पूर्ण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे’, अशा भावना स्वराजने विजयानंतर व्यक्त केल्या. स्वराजच्या या कामगिरीमुळे आगामी काळात जागतिक स्तरावरील इंग्लिश चॅनेल सारख्या कठीण स्पर्धांसाठी त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version