स्वस्तिक मंडळ बजरंग सुवर्ण चषकाचा मानकरी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई उपनगरच्या स्वस्तिक बजरंग क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरुष गट अमृत महोत्सवी कबड्डी स्पर्धेत सुवर्ण चषक पटकाविला. स्वस्तिक मंडळाच्या अक्षय बर्डेला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. त्याला रोख रु. पंचवीस हजार देऊन गौरविण्यात आले. ना.म.जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्वस्तिक मंडळाने अंकुर स्पोर्टस्चा प्रतिकार 35-26 असा मोडून काढत सुवर्ण चषक व रोख रु. पंच्याहत्तर हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अंकुरला चषक व रोख रु. एकावन्न हजारवर समाधान मानावे लागले.

आक्रमक सुरुवात करीत स्वस्तिकने पहिला लोण अंकुरवर देत आघाडी घेतली. पूर्वार्धात 17-11अशी महत्वपूर्ण आघाडी स्वस्तिककडे होती. उत्तरार्धात आक्रमकतेला मुरड घालत संयमी खेळावर भर देत स्वस्तिकने अंकुरवर आणखी एक लोण देत आपली आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेतली. अंकुरला एकही लोण देता आला नाही. पण त्यांनी 3 अव्वल पकड व 5 बोनस गुण घेतले. याचा त्यांना फायदा झाला नाही. शेवटी झटापटीच्या गुणांवर स्वस्तिकने 9 गुणांनी बाजी मारत चषक उंचावला.

याअगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात स्वस्तिकने उत्कर्षाला 40-13 असे, तर अंकुरने बंड्या मारुतीला 27-19 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.एकवीस हजार प्रदान करण्यात आले. अंकुर स्पोर्टस्चा सुशांत साईल स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू, तर अंकुरचाच राकेश भोसले स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पंधरा हजार(15,000/-) देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू सीताराम साळुंके यांच्या उपस्थितीत पार पडले.

Exit mobile version