ऐन गणेशोत्सवात मिठाई विक्रेते संकटात

। पनवेल । वार्ताहर ।
गणेशोत्सव येऊन काही दिवसावर येऊन ठेपला आहे. सध्या बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह संचारला असून सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या रायगड विभागाचे सहायक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी दिली आहे.

गणेशोत्सव काळात मिठाईला मोठी मागणी असते. मिठाई बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मावा आणि खव्याची गरज लागते. मात्र, बाजारात पुरवठा कमी आणि मागणी वाढल्याने काही दुकानदार भेसळयुक्त मावा आणि खव्याचा आधार घेत मिठाई बनवतात. अशा अन्नपदार्थांच्या सेवनामुळे विषबाधेसारख्या घटनांचा धोका अधिक असल्याने अन्न व औषध विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पनवेल परिसरात मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अन्न व औषध विभागाचे चार अधिकारीदेखील कार्यरत राहणार असून मिठाई दुकानांना भेट देऊन तपासणी केली जाणार आहे.

खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. मिठाई दुकान परिसर स्वच्छ, कीटकनाशकांपासून संरक्षित असावे. याविषयी मिठाई दुकानदार आणि विक्रेत्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

– लक्ष्मण दराडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध विभाग, रायगड



Exit mobile version