। पनवेल । प्रतिनिधी ।
मिठाईच्या बॉक्सवर त्याचबरोबर दुकानांमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर मिठाईची ’एक्सपायरी डेट’ ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावण्यात यावी, असा आदेश भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने 2020 साली जारी करण्यात आला होता.
एफएसएसआयच्या त्या आदेशाचे नंतर काही दिवस दुकानदारांनी पालन केले. आता मात्र दुकानदारांना एफएसएसआयच्या त्या निर्णयाचा दुकानदारांना विसर पडल्याचे पाहायला मिळत असून, पनवेल पालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खांदा, कळंबोली, खारघर तसेच इतर वसाहतीमधील मिठाईच्या दुकानात विक्री करिता उपलब्ध असलेल्या मिठाइवर एक्स्पायरी डेटच टाकण्यात येत नसल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. मिठाई दुकानदारांना मिठाईच्या बॉक्सवर त्याचबरोबर दुकानांमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर मिठाईची ’एक्सपायरी डेट’ दर्शनी भागात ग्राहकांना दिसेल अशी लावण्याचे निर्देश एफएसएसआयतर्फे देण्यात आले होते. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित मिठाई दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे सनसूंदीच्या काळात ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध होणे शक्य आहे. एफडीआय, एफएसएसआयकडुन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानदारांचे फावत असल्याचे चित्र आहे.
सण उत्सव काळात पाळले जातात नियम सण उत्सव काळात मिठाईला मोठी मागणी असते. या काळात एफडीआयकडून कारवाई होण्याची भीती असते. या मुळे कारवाईच्या भीतीने मिठाई दुकानदार सन उत्सव काळात नियमांचे पालन करताना दिसतात. मात्र इतर दिवसात मिठाईला हवी तितकी मागणी नसल्याने बनवलेली मिठाई जास्तीत जास्त दिवस विकता यावी या करता दुकानदार नियमाना बगल देताना दिसून येतात.