नशेसाठी सिरिंजचा वापर

पनवेल परिसरातील मेडिकलमध्ये सिरिंजची मागणी वाढली; औषध दुकानदारांची माहिती



| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

स्वस्त नशा करणार्‍यांकडून सध्या सिरिंजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे पनवेल परिसरातील औषध दुकानामध्ये सिरिंजच्या मागणीत वाढ झाली असल्याची माहिती मेडिकल दुकानदारांनी दिली असून, मागणीत झालेली वाढ चिंताजनक असल्याचे मत विक्रेते व्यक्त करत आहेत.

महाविद्यालयीन तरुणांमध्ये सध्या नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. खिशात असलेल्या अपुर्‍या पैशांमुळे महागडी नशा करणे परवडत नसल्याने स्वस्त नशा करण्याकडे नशा करणार्‍यांचा कल वाढला आहे. देशभरातील राज्यात सध्या ‘चिट्टा’ या नावाने विकल्या जाणार्‍या नशेच्या पदार्थाने हाहाकार उडवला आहे. प्रामुख्याने उत्तर भारतातील राज्यातील नशेखोर याचा वापर नशेसाठी करत असून, नशेच्या अतिसेवनामुळे अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच पनवेल परिसरातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये चिट्टाची नशा करण्याची क्रेज वाढल्याचे आणि परिसरात नशेचा हा पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे स्पष्ट होत आहे. परिसरातील उद्यान, ओसाड जागांवर नशेखोरांनी आपले अड्डे थाटले आहेत. अशा ठिकाणी नशेसाठी वापरण्यात येणार्‍या सिरिंजचे ढीग सध्या पाहायला मिळत आहेत.

काय आहे चिट्टा?
हेरोईन आणि एलएसडीचे खास मिश्रण करून कापरासारखा एक पदार्थ तयार केला जातो. पनवेल परिसरात सध्या या मिश्रणाची विक्री करण्यात येत आहे. गरम पाण्यात मिसळून प्रत्येकी पाच एमएलप्रमाणे एक डोस अशा प्रमाणात ही नशा केली जात आहे.
सिरिंजचा वापर धोकादायक
नशेसाठी होणारा सिरिंजचा वापर धोकादायक आहे. अनेकदा एकाच सिरिंजचा वापर चार ते पाच जण करत असल्याने यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून नशेखोर युवक आपल्यासोबत डेटॉल्स ठेवून सिरिंजची सफाई करून पुन्हा वापर करण्याची शक्कल लढवत आहेत.
सिरिंजची विक्री दुप्पट
काही महिन्यांपूर्वी सिरिंजची होणारी विक्री सध्या दुप्पट झाली आहे. सिरिंज खरेदीसाठी डॉक्टरच्या चिट्ठीची गरज नसल्याने नाईलाजास्तव नशेसाठी सिरिंजचा वापर करणार्‍याला सिरिंज द्यावी लागत असल्याचे मत औषध विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
Exit mobile version