ताडगाव ग्रामपंचायत कार्यालय भग्नावस्थेत

भाड्याच्या खोलीमध्ये कारभार

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील ताडगाव ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पूर्णपणे कोलमडली आहे. पावणे तीन वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे हे कार्यालय कोसळले आहे. आजतागायत येथे कोणतीही नवीन इमारत न बांधता भाड्याच्या अवघ्या दोन खोल्यांमध्ये ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. त्यामुळे येथे कामानिमित्त येणारे ग्रामस्थ, येथील कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांची खूप गैरसोय होत आहे.

सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेतून ग्रामपंचायतचा कारभार सुरू होता. त्यावेळी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मात्र शाळा सुरू झाल्यावर गावातील एका घरातील दोन खोल्या भाड्याने घेऊन तिथे ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे.

ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती, जिल्हाधिकारी व पाली-सुधागड पंचायत समिती कार्यालयाकडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधून देण्यासंदर्भात विनंती अर्ज केले आहेत. शिवाय ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव सुद्धा घेण्यात आला होता. मात्र याकडे आजतागायत कोणीही लक्ष दिलेले नाही. यामुळे येथील व आजूबाजूच्या गाव आणि वाड्यातील ग्रामस्थ, कर्मचारी व लोकप्रतिनिधी अक्षरशः हतबल झाले आहेत. नक्की दाद कोणाकडे मागावी हा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील पहिले घर असते, मात्र या घराची अशी दुरवस्था होणे आणि याकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष करणे हे खेदजनक आहे. यामुळे गावची शोभा लोप पावत आहे. शासनाने लवकर येथे सुसज्ज व सोईसुविधांनी युक्त इमारत बनवून द्यावी.

सचिन साठे, ग्रामस्थ, ताडगाव

कार्यालय दुरुस्ती व नवीन कार्यालय बांधून देण्यासंदर्भात ग्रामपंचायत मार्फत संबधीत सर्व शासकीय अधिकारी व कार्यालयांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नुकताच पदभार स्वीकारल्यावर यासंदर्भात मी सुद्धा पाठपुरावा करत आहे.

करुणा साठे, सरपंच, ताडगाव
Exit mobile version