पीडित विवाहितेची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
विवाहबाह्य संबंध ठेवणार्या पतीवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप एका विवाहितेने पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. आपला पती पोलीस असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यामध्ये 24 वर्षीय पीडित महिलेने आपला पोलीस नवरा व त्याची मैत्रीण व तिचा नवरा यांच्याविरुध्द 6 जानेवारी 2023 रोजी फिर्याद नोंदविली होती. या फिर्यादीनुसार पोलीस सुजीत पाटील, त्याची मैत्रीण प्रज्ञा अमर पाटील, तिचा नवरा अमर सुरेश पाटील यांच्याविरुध्द पेण पोलीस ठाण्यात कारवाई होत नसल्याने सोमवारी पीडित महिलेने पेण येथे पत्रकार परिषद घेत आपली कैफीयत मांडली.
गुन्हा नोंद होऊ नये म्हणून खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र, मी माझ्या मतावर ठाम राहून गुन्हा नोंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 6 जानेवारी 2023 रोजी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु, आज दहा दिवस उलटून ही साधा पंचनामा करण्यासाठीदेखील पोलीस फिरकले नाहीत. याचे अजब वाटते, नवरा पोलीस असून त्याची मैत्रीण व मैत्रिणीचा नवरा पैसेवाले असल्याने मुद्दामहून या गुन्ह्याचा तपास होण्यास दिरंगाई होत आहे. आज माझ्यावर एवढा अत्याचार होऊन आरोपी उजळ माथ्याने सरेआम फिरताना दिसतात. मात्र, मी काहीही करू शकत नाही. माझी लाचारासारखी अवस्था झालेली आहे. तरी मला न्याय मिळावा एवढीच भाबडी इच्छा, असे मत प्रसार माध्यमांसमोर पीडित महिलेने मांडले आणि कळत नकळत आपल्या अश्रुंना वाट करून दिले.
कारवाई केली जाईल
पीडित महिलेची पत्रकार परिषद झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडे पेणचा अतिरिक्त भार असल्याने ते खोपोलीला होते. दूरध्वनीवरून त्यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राजू पाटील यांनी संपर्क साधून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणे करून दिले. त्यावेळी त्यांनी सदरील प्रकरणाची योग्य ती माहिती घऊन आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सूचित केले.