रेशनदुकानदारावर कारवाई करा

बहुजन युथ पँथरची मागणी, आंदोलनाचा इशारा

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर तालुक्यातील चौक गावातील रेशनिंग दुकानदाराने ग्रामस्थांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू दिल्यामुळे गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून या दुकानदारावर कडक कारवाई करावी याकरिता नागरिकांकडून खालापुरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

चौक रेशन दुकानदार चौधरी ग्राहकांना रेशन दिल्यानंतर त्याची रीतसर पावती ग्राहकांना देत नाही. शिवाय अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ ग्राहकांना दिल्यामुळे चौकमधील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी दिलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ तहसीलदार आणि कार्यालयातील पुरवठा अधिकार्‍यांना दाखवण्यात आले असून या दुकानदारा विरोधात आठ दिवसांत कडक कारवाई करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन युथ पॅथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील जाधव आणि चौक, तूपगावातील नागरिकांनी दिला आहे.

Exit mobile version