घरकुल योजनांचा लाभ घ्याः डॉ. योगेश म्हसे

| अलिबाग | प्रतिनिधी |

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शहरी व ग्रामीण कुटुंबांना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि धनगर या घटकातील ग्रामीण क्षेत्राकरिता घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांचे कच्चे घर असल्यास ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये आणि शहरी भागासाठी तीन लाख रुपये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे. रमाई आवास योजनेंतर्गत 269 चौ.फु.घरकुल मंजुर करण्यात येते. या घरकुलासाठी ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये आणि शहरी भागसाठी दोन लाख 50 हजार अनुदान मिळणार आहे. तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती या घटकातील लाभार्थ्यांसाठी ग्रामीण भागासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत वैयक्तिक घरकुल योजना आणि धनगर समाजासाठी वैयक्तिक घरकुलासाठी योजना आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये आहे. एक लाख 20 हजार अर्थसहाय्य आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दिले जाते.

या दोन्ही योजनांकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जागेची आवश्यक कागदपत्रे आणि अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन डॉ. म्हसे यांनी केले, आहे.

Exit mobile version