| महाड | प्रतिनिधी
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल कंपनीत वायुगळती होऊन एका कामगाराचा मृत्यू, तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहे. दरम्यान, या कंपनीवर ठोस कारवाई करण्याची मागणी दक्षिण रायगड युवा सेनेचे जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे यांनी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल कंपनीमध्ये 5 ऑक्टोबर रोजी सकाळी वायुगळती होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. या कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या कंपनीत झालेली वायुगळती ही तिसऱ्यांदा झाली असल्याने या प्रकाराला पूर्णपणे कंपनी व्यवस्थापन जबाबदार आहे. वारंवार कंपनीमध्ये होणारे अपघात पाहता कंपनी निरीक्षक व कंपनीचे व्यवस्थापन जबाबदार असून, यावर ठोस कारवाई होण्याची गरज असल्याचे चेतन पोटफोडे यांनी म्हटले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या प्रसोल कंपनीमध्ये घडलेल्या घटनेबाबत कंपनी व्यवस्थापनाचे जाधव यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी चेतन पोटफोडे यांच्यासहित महाड युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रफुल्ल धोंडगे, निलेश शिंदे, निलेश सुतार, अमरजीत नगरकर, नथू बुवा दिवेकर, बॉबी पॉल, श्री. साळुंखे, रोहन वाडीले, संतोष चिकणे, हेमंत पोटफोडे, प्रीतम उमासरे इत्यादी शिष्टमंडळाने कंपनीतील कामगारांच्या संरक्षणासंदर्भात व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून यातून भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत असे कंपनी व्यवस्थापनाला चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
दरम्यान, कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व कंपनी निरीक्षक कोणतेही पावले उचलताना दिसत नसल्याने कंपनीमध्ये काम करणाऱ्या उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये तसेच आसपासच्या स्थानिक ग्रामस्थांमध्येदेखील वायुगळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवर तातडीने ठोस कारवाई करण्यात आली नाही तर युवा सेना उग्र आंदोलन करील, असा इशारा चेतन पोटफोडे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.






