| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील समुद्रात विविध प्रकारची रसायने, तेलवाहू जहाजांमधून गळती होऊन पसरलेले खनिज तेल, शहरी-नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, कारखान्यांमधील रासायनिक प्रदूषित सांडपाणी, आण्विक ऊर्जानिर्मिती केंद्रातील सांडपाणी, घटक कचरा, प्लास्टिक कचरा इत्यादी अजैविक घटक सागरी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे समुद्राचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली आहे. यावर पर्यावरणमंत्री यांनी दिलेल्या लेखी उत्तरात मान्य करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित असल्याबाबतचा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त अहवालात स्पष्ट केले आहे.
तारापूर व मुंबई येथील काही भागात जमिनीपासून खोल समुद्रात पाच किलोमीटरपर्यंत सांडपाणी विसर्गामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त प्रदूषण आढळून येते. या अहवालात पाच किलोमीटर डहाणू व मालवण समुद्रकिनारे प्रदूषणमुक्त आहेत. तसेच जमिनीपासून पाच किलोमीटर जास्त खोल समुद्रात प्रदूषणाची मात्रा दिसून येत नाही. असे अनुमान राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने 2015-16 साला मध्ये केलेल्या अहवालात दिसून येते, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.