अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा

मध्य रेल्वे महाप्रबंधकाकांडे अभिजीत पाटील यांची मागणी
| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तात्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला मदत व्हावी या उद्देशाने रेल्वेचे इंजिन आणि शेवटच्या डब्याला उच्चप्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीचे सदस्य अभिजित पाटील यांनी केली. ते क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीच्या बैठकीदरम्यान पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावर घडणार्‍या अपघाताबाबत करण्यात येणार्‍या उपाययोजनांसंदर्भात बोलत होते.

झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक नुकतीच मुंबई येथील छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस खासदार जयसिद्धेश्‍वर स्वामी, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे, सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील, एनआरयुसीसीचे नवनिर्वाचित सदस्य अजयकुमार दुबे, डॉ.आसिफ पटेल, रवींद्र पाटील यांच्यासह सर्व सल्लागार समिती सदस्य आणि मध्य रेल्वेचे अधिकारीवर्ग उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावरील उपाययोजनांच्या अभावामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडून असंख्य नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे पनवेल तालुक्यातील रेल्वे अपघात समस्यांच्या उपाययोजनांबाबत अभिजित पाटील यांनी सर्व समस्या रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून उपाययोजना करण्याची मागणी केली. या मागण्यांबाबत रेल्वे प्रशासनाकडून उदासीनता दर्शविण्यात आली असून, या प्रश्‍नावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पनवेल तालुक्यातील रेल्वे मार्गावर घडणार्‍या अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या नागरिकांच्या जीवाशी रेल्वे प्रशासन कधीपर्यंत खेळणार? असा सवाल मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे.

लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक
या बैठकीस उपस्थित असलेले सल्लागार समितीचे सदस्य खासदार जयसिद्धेश्‍वरस्वामी यांनी अभिजित पाटील यांच्या सूचना रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन राज्य सरकार व रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून यातून योग्य मार्ग काढावा असे निर्देश मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अजयकुमार लाहोटी यांना दिले. तसेच लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नियोजित बैठक करून हे प्रश्‍न सोडवण्याबाबत आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version