| अलिबाग | प्रतिनिधी |
रयतेचे हित जपण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले आहे. अठरा पगड जातीमधील मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम महाराजांनी केले. महाराष्ट्राच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी गडकिल्ले उभारले. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंबेपूर-ढोलपाडा येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, कार्यकर्ते, महिला, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणे गरजेचे आहे. कारण यातून महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला समजला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकरांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालणारा महाराष्ट्र आहे. मात्र, काही जण महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवभक्तांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला न्याय दिला पाहिजे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्याः चित्रलेखा पाटील
