तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक वॉर्डनिहाय घ्या

सभासदांची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
जुलै महिन्यात मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होणार आहे. ही निवडणूक वॉर्डनिहाय घेण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोट्यवधींची रुपयांची वार्षिक उलाढाल सुपारी संघामार्फत होत असते. त्यामुळे संघावर प्राबल्य राखण्यासाठी विविध पक्ष मेहनत घेत असतात. यासाठी निवडणूक प्रारूप याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सहकार खात्यामार्फत जारी करण्यात आला आहे. या प्रारूप कार्यक्रमात मुरुड शहरात 7 वॉर्ड होते. फार पूर्वीपासून 7 वॉर्ड मधून सात सदस्य निवडून येत होते. परंतु आताच्या निवडणूक कार्यक्रमात हे 7 वॉर्डमध्ये बदल करून या सर्वांचा एकत्र एकच वॉर्ड तयार करण्यात आला आहे. यावर असंख्य सभासद नाराज असून, पूर्वीप्रमाणेच 7 वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी सुपारी संघाचे सभासद सुधीर पाटील, विनोद भगत, जनार्दन कंधारे, जयंत चौलकर, उमेश माळी यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रायगड अलिबाग यांच्याकडे केला होता. त्यांच्या या मागणीला यश प्राप्त झाले असून, याबाबतची सुनावणी 21 जून रोजी अलिबाग येथे घेण्यात येणार असल्याची माहिती सभासद जनार्दन कंधारे, मुरुड तालुका भाजपचे अध्यक्ष महेंद्र चौलकर, उमेश माळी, विनोद भगत यांनी दिली आहे.


मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या या निवडणुकीत 1304 सभासद संपूर्ण मुरुड तालुक्यामधून मतदान करून आपापले आवडीचे उमेदवार पाठवणार आहेत. या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version