लाचप्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


माणगाव | वार्ताहर |
माणगावात घटनेतील तक्रारदार यांनी अँटीकरप्शन ब्युरो, नवी मुंबई यांच्याकडे आरोपी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. याबाबत आरोपी तलाठीला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अँटीकरप्शन ब्युरोच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. त्याचे सहकारी आरोपी मंडळ अधिकारी हेदेखील त्यात सापडल्याने या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

ही घटना माणगाव येथे अमित कॉम्प्लेक्स गेटच्या समोर मारुती सुझुकी एसक्रॉस गाडी क्र.एम.एच 42/ए.एस /1921 या गाडीमध्ये बुधवार, दि.9 जून रोजी दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात महसूल खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, घटनेतील तक्रारदार यांच्या नावे नारायणगाव (साजे) ता. माणगाव, जि. रायगड हद्दीतील सर्वे नं. 110 हा तक्रारदार व त्यांचे भागीदार यांच्या नावे नोंद करण्याकरिता यांतील आरोपी लोकसेवक सचिन विठ्ठलराव मिसाळ (38) तलाठी (वर्ग 3) सजा विळे, ता. माणगाव, रा. अमित कॉम्प्लेक्स माणगाव, साहेबराव विश्‍वासराव साबळे (57) मंडळ अधिकारी (वर्ग 3) लोणेरे, ता. माणगाव, रा. ग्रीन पार्क माणगाव यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करून बुधवार, दि.9 जून रोजी दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास अमित कॉम्प्लेक्सच्या गेटसमोर गाडीत लाचेची 50 हजार रुपये रक्कम स्वीकारताना आरोपी तलाठी सचिन मिसाळ याला रंगेहाथ पकडले.

या गुन्ह्याप्रकणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्र ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्रीमती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे हे करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी मंडळ अधिकारी साहेबराव विश्‍वासराव साबळे यांच्यावर यापूर्वी मुरुड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

Exit mobile version