अनिल ढवळे यांची तहसीलदारांकडे तक्रार
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील देहरंग येथील मिळकतीच्या वारसनोंदीवरून महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारसनोंदीच्या अर्जाची पडताळणी न करणे, इच्छापत्र व खरेदीखतातील तपशीलांकडे दुर्लक्ष करणे, कागदपत्रांतील विसंगती आणि तहसीलदारांची दिशाभूल केल्याचे आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नामदेव ढवळे यांनी केले आहेत. संबंधित तलाठ्याचे निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच श्रीमती रेखा सदर यांची सातबारा उताऱ्यावर वारसनोंद करावी, अशी मागणी त्यांनी पनवेलच्या अपर तहसीलदारांकडे केली आहे.
तक्रारीनुसार, मुग्धा सातारकर यांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी वारसनोंदीसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत वारसांची नावे, आधारकार्ड आणि आवश्यक कागदपत्रे जोडली होती का, याची तपासणी करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. अर्ज अपूर्ण असल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुग्धा सातारकर यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला नसल्याचे ढवळे यांनी म्हटले आहे. वारस पुणे येथे राहात असतानाही पुणे येथील जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून वारसांची पडताळणी करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अर्जासोबत सातबारा उतारा व फेरफार नोंद जोडण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
तक्रारीतील माहितीनुसार, इरीन मेरी अल्बर्ट फ्रॉन्सीका यांनी 23 एप्रिल 2008 रोजी पुणे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात इच्छापत्राची नोंदणी केली होती. या इच्छापत्रात विश्राम को-ऑपरेटिव्ह सोसायटी, 1008/1 नाना पेठ, पद्मजी मार्ग, पुणे; वर्षा अपार्टमेंट कंडोमिनियम, 689 नानापेठ, पुणे; तसेच सेंट प्रॅक्टिस टाउन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, सर्व्हे क्रमांक 29, वानवडी, पुणे येथील मालमत्तांचा उल्लेख असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. इच्छापत्रात आठ अपत्यांचा उल्लेख असून, ख्रिस्तोफर, त्यांची सून प्रॅक्टिस, टेरेन्स आणि अल्फेया डायस यांच्यासह विविध व्यक्तींच्या हक्कांचा व अधिकारांचा संदर्भ देण्यात आला आहे.
इच्छापत्रातील परिच्छेद क्रमांक 10 मध्ये अल्फेया डायस आणि टेरेन्स फ्रॉन्सीका यांना कार्यकारी विश्वस्त म्हणून काही अधिकार दिल्याचे नमूद आहे. परिच्छेद क्रमांक 12 मध्ये यापूर्वी मुलांना हस्तांतरित केलेल्या मालमत्ता त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या राहतील आणि त्यांचा इच्छापत्रातील एकूण संपत्तीत समावेश होणार नाही, असा मजकूर असल्याचे ढवळे यांनी निदर्शनास आणले आहे. मात्र, देहरंग येथील सर्व्हे क्रमांक 1/8/23 या मिळकतीचा इच्छापत्रात स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. इच्छापत्रातील इरीन मेरी अल्बर्ट फ्रॉन्सीका आणि इरीन मेरी प्रॉन्सेकर या नावांबाबतही संभ्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारीनुसार, 24 नोव्हेंबर 1965 रोजी इरीन मेरी फ्रॉन्सीका यांनी पनवेल तालुक्यातील देहरंग येथे हरी माधव गुरूजी यांच्याकडून 1,200 रुपयांना बिगरशेती प्लॉट खरेदी केला होता. या व्यवहारातील फेरफार क्रमांक 207 मध्ये तुरा आणि वेरनॉन या अल्पवयीन मुलांचा तसेच त्यांच्या आईचा अज्ञानपालनकर्ती म्हणून उल्लेख असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तुरा, वेरनॉन आणि सलीना यांच्या मृत्यूचे दाखले, खरेदीखत, सातबारा उतारा, फेरफार नोंदी व इतर कागदपत्रे सादर केल्याचेही ढवळे यांनी नमूद केले आहे.
इरीन मेरी फ्रॉन्सीका यांचा मृत्यू 14 डिसेंबर 2002 रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी रुग्णालयात झाल्याचा दाखला उपलब्ध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, 5 जानेवारी 2026 रोजी पनवेल दिवाणी न्यायालयातील अर्ज क्रमांक 1054/2024 च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये संबंधित मालमत्तेचा आजीच्या मालमत्तेच्या संदर्भात उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुग्धा सातारकर यांच्या अर्जावरील छायाचित्र आणि आधारकार्डावरील छायाचित्र यांत मोठी तफावत असल्याचेही ढवळे यांनी म्हटले आहे.
तलाठ्यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदारांना दिलेल्या पत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अनिल ढवळे यांनी 12 ऑक्टोबर 2026 रोजी संबंधित मिळकतीसंदर्भातील कागदपत्रे मागितली असता, मुग्धा सातारकर यांचा एकच अर्ज देण्यात आला; मात्र 29 नोव्हेंबर 2025, 22 सप्टेंबर 2025 आणि इतर तारखांच्या अर्जांचा संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इच्छापत्राची सत्यता, अर्जांमधील विसंगती आणि वारसनोंदीच्या प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणात तलाठ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यवाही केल्याचा, न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि संबंधितांना मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत 25 लाख रुपयांच्या मागणीचाही उल्लेख करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करून संबंधित तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, निलंबित करावे आणि कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नामदेव ढवळे यांनी केली आहे. तसेच श्रीमती रेखा सदर यांच्या वारसाहक्काची कायदेशीर पडताळणी करून सातबारा उताऱ्यावर वारसनोंद करावी, अशी मागणी त्यांनी अपर तहसीलदारांकडे केली आहे.






