तळगडाचे बुरुज ढासळताहेत; किल्ल्याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

डागडुजी करण्याची गडप्रेमींची मागणी

| तळा | वार्ताहर |

तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाले असून, दिवसेंदिवस तळगड किल्ला ढासळत असल्याने या किल्ल्याची डागडुजी करण्याची मागणी गडप्रेमींकडून करण्यात येत आहे.

तळा शहराला लाभलेलं ऐतिहासिक वैभव म्हणून तळगड किल्ल्याकडे पाहिले जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक ऐतिहासिक तळगड किल्ल्याला आवर्जून भेट देतात. तसेच राज्यभरातून अनेक गडप्रेमी पर्यटक सहलीनिमित तळगड किल्ल्यावर येतात. मात्र, याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. तसेच किल्ल्याचे संवर्धन केले जात नसल्याने अनेक गडप्रेमींकडून नाराजीदेखील व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून तळगड किल्ल्याची तटबंदी व बुरुज ढासळत असून, किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायर्‍यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. यांसह किल्ल्यावर शिवमंदिर बांधणे, किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी ध्वज लावणे, तोफांना तोफगाडे बसविणे, किल्ल्याच्या प्रत्येक ठिकाणांवर फलक लावणे यांसारखी कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तळगडाची डागडुजी करावी, अशी मागणी गडप्रेमींकडून केली जात आहे.

Exit mobile version