विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी राज्यपालांशी चर्चा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून सांगतो, असे आश्‍वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज राजभवनावर आले होते. या तिन्ही नेत्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला. या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी मीडियाशी संवाद साधून चर्चेची माहिती दिली.

Exit mobile version