मुलीचे अपहरण करुन वडिलांकडून पैसे वसुल करण्याचा होता डाव
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
गेमिंग अॅपमुळे कर्जबाजारी झालेल्या एका इसमाने दोन वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना तळोजा औद्योगिक क्षेत्राशेजारील देवीचा पाडा या गावात घडली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले असून, अहमद अन्सारी असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी मृत मुलीच्या शेजारीच राहायला असून, मोबाईल गेमिंग अॅपच्या नादात कर्जबाजारी झाल्याने मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्याचा आणि मृतदेह दूर कुठेतरी टाकण्याचा आणि नंतर मुलीचे अपहरण झाल्याचे भासवत मुलीच्या वडिलांकडे पैसे मागण्याचा आरोपीचा डाव होता. मात्र, मुलगी हरवल्याची बोंबाबोंब होऊन तपासासाठी पोलीस आल्याने घाबरलेल्या आरोपीने मुलीच्या घरातच सुटकेसमध्ये मृतदेह ठेवून दिल्याची कबुली दिली आहे. हर्षिका अमरेश शर्मा ही दोन वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारपासून राहत्या घरातून बेपत्ता होती. यासंदर्भातील तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. बुधवारी रात्री घरातील पोटमाळ्यावरुन दुर्गंधी येत असल्याने शोध घेतल्यावर एका सुटकेसमध्ये बेपत्ता बालिकेचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर तपास करत अवघ्या काही तासातच तळोजा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.