। रायगड । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लवकरच आठ पदरी होणार आहे. सध्या एक्स्प्रेस वेवर जाण्यासाठी तीन आणि येण्यासाठी तीन अशा सहा मार्गिका असल्या तरी सकाळी आणि रात्री महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन्ही बाजूने एक-एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात एक्स्प्रेस वेवरील प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुमारे 95 किलोमीटर लांबीचा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. सध्या या मार्गावर दररोज 50-60 हजार वाहने प्रवास धावतात. भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार असल्याने एमएसआरडीसी खंडाळा घाट सेक्शनमध्ये सुमारे 13 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारत आहे. ही मिसिंग लिंक आठ पदरी असणार आहे. त्यामुळे महामंडळाने आता संपूर्ण एक्स्प्रेस वे आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुण्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेवर एक मार्गिका आणि मुंबईच्या दिशेने येणार्या मार्गिकेवर अतिरिक्त एक मार्गिका तयार केली जाणार आहे.
त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तत्काळ त्याचा अंतिम आराखडा तयार करून निविदा मागविल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 94 किलोमीटरचा असला तरी 13 किलोमीटरची मिसिंग लिंक आठ मार्गिकांचा असणार आहे. तसेच मिसिंग लिंकवर जाण्याआधी दोन्ही बाजूंचा एक्स्प्रेस वेही सध्या चार पदरी केला जात आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ मार्गिकांचा करताना एमएसआरडीसीला प्रत्यक्षात 75 किलोमीटरचा महामार्ग आठ पदरी करावा लागणार आहे. सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांमुळे घाट सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना अमृतांजन पुलाच्या जवळ चढणीला मुंगीच्या वेगाने गाड्या चालत असल्याने मागे वाहनांच्या रांगा लागतात; मात्र एक्स्प्रेस वेवर दोन्ही बाजूंनी एक-एक मार्गिका झाल्यास घाट सेक्शनमधील वाहतूक कोंडी फुटू शकणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सहा मार्गिकांचा असलेला हा महामार्ग आठ मार्गिकांचा करण्याचे नियोजित आहे.
अनिलकुमार गायकवाड,
व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी