। अलिबाग । वार्ताहर ।
यंदा फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसू लागले असून धरणे, तलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील अनेक गाव-वाड्यांत सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. टंचाई निवारणासाठी आराखडा तयार केला असता तरी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन कामासाठी वापर करावा, पाणीस्रोत दूषित होणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे जलवाहिनी फुटली असल्यास त्वरित निदर्शनास आणून द्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी पाच कोटी 62 लाख 68 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात एक हजार 16 गावे-वाड्यांचा समावेश आहे. यात विहिरी खोल करणे, गाळ काढणे या कामासाठी 60 लाख 18 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे तीन कोटी 52 लाख 92 हजार, नवीन विंधन विहिरी एक कोटी तीन लाख 68 हजार, विंधन विहिरींची दुरुस्तीसाठी 45 लाख 90 हजारांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो; मात्र नियोजनाअभावी पाणी समुद्रात वाहून जाते. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. दुसरीकडे कोकणातील जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे पावसाळ्यात ज्या ठिकाणी मुबलक पाणी असते, त्या ठिकाणी उन्हाळ्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करून ते साठवले तर उन्हाळ्यातील टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. टँकरची व्यवस्थाही करण्यात येत आहे. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळून पाणी जपून वापरावे. आराखड्यात समाविष्ट कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद.