। पनवेल । संजय कदम ।
वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करणार्या आंतरराज्यीय टोळीच्या म्होरक्याला तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी सहाबुददीन मोईनुददीन खान रा. मुंब्रा हा मार्केट रेट पेक्षा कमी भावाने लोखंडी रॉड, लोखंडी कॉईल, बॅटरी असा माल देतो, असे सांगुन एखाद्या कंपनीत माल घेणार्या खरेदीदाराला घेवुन जावून लोखंडी रॉड, लोखंडी कॉईल, बॅटरी दाखवत असे.
त्यानंतर खरेदीदाराच्या कंपनीचे बॅक करंन्ट अकाउंट नंबर देवुन त्यात मालाचे पैसे टाकण्यास सांगत. त्यानंतर डिल निश्चित झाल्यानंतर माल ट्रकमध्ये भरल्यानंतर पार्टीकडुन बँक खात्यात पैसे घेत. तसेच माल न देता लागलीच बँक खात्यातुन पैसे काढुन बँक खाते व मोबाईल नंबर बंद करून पसार होत असे. अशा प्रकारे त्याच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यासह ढोलका पोलीस ठाणे, मोहाडीनगर पोलीस ठाणे, पंजाबी बाग पोलीस ठाणे, कळंबोली पोलीस ठाणे, खालापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.
याबाबत पोलीस निरिक्षक काशिनाथ चव्हाण, पोलीस निरिक्षक (गुन्हे) दत्तात्रेय क्रिदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय पवार, पोलीस हवालदार नैनेश पाटील, वैभव शिंदे, पोलीस नाईक विजय पाटील, शंकर शिंदे, पोलीस शिपाई अनिल जाधव, स्वाप्निल पाटील, संदेश उतेकर यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.