| कोर्लई | प्रतिनिधी |
शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्रीवर्धन तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक रा. पा. दिवेकर हायस्कूल, दांडगुरी येथे तालुकास्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीवर्धन तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव, दांडगुरी दिवेकर हायस्कूलचे चेअरमन वसंत राऊत, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील, दिघी पोर्ट इंजिनिअर विभाग प्रमुख गोपाल अहिरकर, विस्तार अधिकारी मनोज माळवदे आदी.मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी व सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रात अदानी फाउंडेशन करीत असलेल्या कार्याचा चढता आलेख व्यक्त केला. तर गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी शिक्षक गौरव हा उपक्रम स्तुत्य असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अदानी फाउंडेशनतर्फे अशाच उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे विस्तार अधिकारी मनोज माळवदे यांनी सांगितले. या सोहळ्यात एकूण 40 गुणवंत शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.







