। तळा । वार्ताहर ।
आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर तळा तालुक्यात बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे बरेच दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला असून बळीराजा शेती लावणीच्या कामात व्यस्त झाला आहे. सुरुवातीस मुसळधार कोसळलेल्या पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतीची कामे देखील रखडली होती. तालुका डोंगराळ असल्याने शेतीसाठी उभ्या पाण्याची अधीक गरज असते. यंदा भात शेतीत आलेले आवण लावणी योग्य झाल्याने बहुतांश शेतकर्यांनी आपल्या शेतात नांगरणी करुन मातीची फोड देखील करून ठेवली होती. केलेली फोड पाऊस नसल्याने संपूर्ण सुकून गेली होती तर काही ठिकाणी पाण्याअभावी भाताची रोपे पिवळी पडू लागली होती. काही जणांनी हंड्याने पाणी आणून रोपे जगवण्यासाठी प्रयत्न केला होतो. परंतु, बुधवारी सकाळपासून तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतामध्ये पाणी तुंबून शेतकर्यांना लावणी करणे शक्य होणार आहे.