ताम्हिणी घाट बनतोय मृत्यूचा सापळा

नागमोडी वळणांवर काळाचा घाला; तीन वर्षांत 39 जणांचा मृत्यू

| माणगाव | प्रतिनिधी |

सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची चादर, खळाळणारे धबधबे आणि निसर्गाचे मनमोहक सौंदर्य यामुळे ताम्हिणी घाट पर्यटकांचे विशेष आकर्षण बनला आहे. मात्र, याच निसर्गरम्य घाटातील नागमोडी वळणे, खोल दऱ्या आणि धोकादायक चढ-उतार आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा की अपघाताच्या रूपाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपलब्ध प्रसिद्ध आकडेवारीनुसार, 2023 ते ऑक्टोबर 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत ताम्हिणी घाटात तब्बल 95 अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये 39 जणांचा मृत्यू तर 175 जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी केवळ संख्या नसून अनेक कुटुंबांच्या वेदना आणि आयुष्यभराची हानी दर्शविणारी आहे. 2023 मध्ये 21 अपघात झाले. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले. 2024 मध्ये अपघातांची संख्या वाढून 39 वर पोहोचली. या वर्षात 18 जणांना जीव गमवावा लागला, तर 101 जण जखमी झाले. 2025 मध्ये ऑक्टोबरअखेर 35 अपघातांची नोंद झाली असून, 15 जणांचा मृत्यू आणि 44 जण जखमी झाले आहेत. एकूण तीन वर्षातील अपघातात 95 मृत्यू 39 जखमी 175 झाले आहेत.

तर 2024 मधील 39 अपघात आणि 18 मृत्यू ही बाब विशेष चिंताजनक आहे. 2025 मध्येही अपघातांचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. कोंडेथर, निवे परिसरासह घाटातील अनेक ठिकाणी तीव्र वळणे आणि खोल दऱ्या आहेत. काही ठिकाणी संरक्षक कठडे किंवा रेलिंगचा अभाव, अपुरे दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी कमी प्रकाश यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. वेगात वाहन चालविणे, चुकीचे ओव्हरटेकिंग आणि आंधळ्या वळणांवरील निष्काळजीपणा अपघातांना निमंत्रण देऊ शकतो.

पावसाळ्यात दाट धुके, निसरडे रस्ते, दरड कोसळणे आणि रस्ता खचण्याच्या घटना यामुळे प्रवास अधिक धोकादायक होतो. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केलेली वाहने यांचाही वाहतुकीवर परिणाम होतो. नोव्हेंबर 2025 मध्ये थार वाहन दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. नोव्हेंबर 2026 मध्येही एका उद्योजकाच्या कारचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून धोकादायक वळणांवर मजबूत संरक्षक कठडे, रेलिंग, दिशादर्शक फलक आणि वेगमर्यादेचे फलक बसविणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था, पावसाळ्यात दरडप्रवण भागांवर देखरेख, आपत्कालीन रुग्णवाहिका, क्रेन आणि मदत केंद्रांची उपलब्धता वाढवावी. पोलिसांनीही वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य द्या
अपघातानंतर मदतीला धावण्यापेक्षा अपघातच होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. 39 मृत्यूंची पुनरावृत्ती होऊ नये, एकाही कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये आणि प्रत्येक प्रवासी सुखरूप घरी पोहोचावा, यासाठी ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्थेला आता प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.
Exit mobile version