सहा महिन्यांत दोन हत्या, निसर्गरम्य घाटातील प्रवास चिंताजनक
| माणगाव | सलीम शेख |
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या निसर्गरम्य ताम्हिणी घाटात गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत या परिसरात दोन हत्यांच्या घटना घडल्याने ताम्हिणी घाटा बाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जानेवारी महिन्यात सुमारे 25 वर्षीय तरुणाची हत्या झाल्यानंतर आता ऑगस्टमध्ये सुमारे 30 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने ताम्हिणी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. एकीकडे निसर्गाचे अद्भुत सौंदर्य, धबधबे आणि हिरवाई व ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला ताम्हिणी घाट आता वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत येत आहे. त्यामुळे ‘निसर्गरम्य ताम्हिणी घाट की गुन्हेगारीचा हॉटस्पॉट’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माणगाव-पुणे ताम्हिणी घाट मार्ग हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आणि जवळचा दळणवळणाचा मार्ग आहे. सुमारे पंचवीस वर्षांपासून या मार्गामुळे दोन्ही भागांतील प्रवास अधिक सुलभ झाला आहे. पावसाळ्यात ताम्हिणी घाटाचे रूप अक्षरशः स्वर्गीय होते. शेकडो मीटर उंच डोंगर कड्यावरून कोसळणारे फेसाळ धबधबे, धुक्याची दुलई पांघरलेले डोंगर, खोल दऱ्यांमध्ये पसरलेली हिरवाई, रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली घनदाट झाडी आणि वाऱ्याच्या तालावर डोलणाऱ्या वृक्षवेली यामुळे संपूर्ण घाट परिसर जणू निसर्ग चित्रच भासतो.
मात्र याच घनदाट जंगलाची, खोल दऱ्यांची आणि कडेकपारींची दुसरी बाजूही तितकीच गंभीर आहे. दिवसा वर्दळ, रात्री मात्र शुकशुकाट… दिवसा ताम्हिणी घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असली तरी रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी या मार्गावर वाहतूक तुलनेने नगण्य होते. घनदाट जंगल, अंधार, निर्जन भाग, डोंगर-दऱ्या आणि मोबाईल नेटवर्कच्या मर्यादा यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास तातडीने मदत मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर घाट परिसरात पोलिसांची नियमित आणि प्रभावी गस्त असणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील रस्त्यावर कोंडेथर गावाजवळ पूर्वी पोलिसांचे चेकपोस्ट होते. मात्र, सध्या या ठिकाणी पोलिसांची नियमित उपस्थिती नसल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी आणि देखरेख कमी झाल्याची भावना नागरिकांमधून बोलताना व्यक्त होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कोंडेथर येथील चेकपोस्ट पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर रायगड आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे या संपूर्ण घाट मार्गावर विशेष गस्त व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ताम्हिणी घाटाची ओळख निसर्ग सौंदर्य आणि पर्यटनासाठीच राहावी, गुन्हेगारीच्या घटनांसाठी नव्हे, यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. पोलीस गस्त वाढविणे, कोंडेथर चेकपोस्ट सुरू करणे, संवेदनशील ठिकाणी निगराणी व्यवस्था उभारणे आणि अपघातग्रस्तांसाठी तातडीची मदत यंत्रणा सक्षम करणे, या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







