राष्ट्रीय आदर्श क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कराटे या क्रिडा क्षेत्रात अलिबागमधील तनिष्का पाटील या तरुणीने भरारी घेतली आहे. तिच्या उत्तम कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय आदर्श क्रिडारत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. छावा प्रतिष्ठान, छावा शिवकालीन बहूउद्देशीय कलामंच आयोजित छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमात नवी मुंबईतील वाशी येथील मराठी साहित्य मंदिर हॉलमध्ये शनिवारी (दि.28) हा गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वस्ताद डॉ. अमित गडांकूश, नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे, नवी मुंबईचे अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, उपआयुक्त डॉ. राज खतीब, पोलीस उपअधीक्षक तथा महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी, मराठी अभिनेते विजय पाटकर आदी मान्यवरांसह महाराणी येसुबाई यांचे वंशज दिपक शिर्के, उद्योजक रोहित पिसाळ, वैभव नाईक, नगरसेविका वैष्णवी नाईक व प्रसिद्ध गायक संकल्प गोळे आदी उपस्थित होते.
तनिष्का पाटील ही खेळाडू अलिबाग तालुक्यातील वाघोडे येथील रहिवासी आहे. सध्या ती पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलमधील इयत्ता सहावी या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती प्रशिक्षक संतोष कवळे यांच्याकडे कराटेचे प्रशिक्षण घेत असून पेझारी कराटे क्लास या ॲकेडमीमध्ये शिक्षण घेत आहे. तनिष्काने आतापर्यंत 40हून अधिक पदके मिळविली आहेत. खोपोली येथे झालेल्या राज्यस्तरिय खुल्या कराटे स्पर्धेत कांस्यपदक व अलिबाग तालुकास्तरिय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून तिची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हा स्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली.
अलिबागमध्ये झालेल्या ऑल महाराष्ट्र थांग- ता असोसिएशन राज्यस्तरिय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली. अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरिय स्पर्धेत कांस्यपदक, मुरूड येथे झालेल्या हिवाळी प्रशिक्षण शिबिरात मास रेसलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मांस रेसलिंग क्रीडा प्रकारात कांस्य व बेल्ट रेसलिंग क्रिडा प्रकारात रौप्यपदक मिळवून यश संपादन केले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तनिष्काला राष्ट्रीय आदर्श क्रिडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
