टँकरमध्ये धाटावच्या एल्पे कंपनीचे रसायन
| नागोठणे | वार्ताहर |
पाटबंधारे खात्याच्या डोलवहाळ येथील बंधार्यातून अंबा खोरे प्रकल्पाच्या नडवली- खांब येथील कालव्याच्या पाण्यात टँकरमधील घातक रसायन सोडणार्या चालकाला पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी गोवंडी-मुंबई येथील टँकर चालक महंमद शेख याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोलाड पोलिसांनी गुरूवारी (दि.6) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील यांनी पोलिसांची गाडी पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टँकर चालकाच्या मुसक्या आवळल्या.
सदरचा रसायन भरलेला टँकर हा धाटाव एमआयडीसीमधील एल्पे कंपनीतून आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने टँकर चालक तसेच सदर टँकर हा नेहा लॉजिस्टिक या कंपनीच्या मालकीचा असल्याने टँकरचा मालक व एल्पे केमिकल कंपनी प्रशासन यांच्या विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कोलाड पोलीस ठाण्यात रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, नागोठणे विभागीय ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, ऐनघर ग्रा.पं. उपसरपंच भगवान शिद, सदस्य मनोहरभाई सुटे, किशोरभाई म्हात्रे, राकेश तेलंगे, जयवंत मुंडे, मनोज खांडेकर, निवास पवार, सुमित काते, प्रकाश डोबळे, भाई लाड, किशोर नावळे, जितेंद्र धामणसे, राजेंद्र कोकळे, प्रतिक गायकर, प्रमोद पाटेकर, संदेश कासार, मंदार कोतवाल आदींसह नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
पाण्यासाठी तहसीलवर धडकणार खांब येथील कालव्यात रसायन सोडल्यानेच अंबा नदीचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्यामुळे साथीचे आजार पसरून मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून ऐनघर पंचक्रोशीसह पाटणसई, वजरोली, वाकण, चिकणी, नागोठणे या गावांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी संबधित ग्रामस्थ शुक्रवार दि. 7 जून रोजी सकाळी 10 वाजता रोहा तहसीलदार कार्यालयावर धडकणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
अंबा नदीचे पाणी दूषित झाल्याने प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असून, असे प्रकार भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी खांब वरुन नडवली गावाकडे जाणारा कालव्याच्या बाजूचा रस्ता केवळ छोट्या वाहनांसाठी सुरु ठेवून टँकरसारख्या मोठ्या वाहनांसाठी पाटबंधारे खात्याने बंद करावा तसेच प्रशासनाने बाधित गावांतील नागरिकांना पाणीपुरवठा करावा.
सदानंद गायकर,
माजी सभापती, पं.स. रोहा