। पोलादपूर । वार्ताहर ।
पाणी टंचाई निवारण आराखडयातील टंचाईग्रस्त गावांची टँकरद्वारे पाणी पुरवठयाची मागणी 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाली असताना जिल्ह्यातील टँकर निविदा धारकाने पोलादपूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रति किलोमीटर भाडे परवडत नसल्याने तसेच भौगोलिकदृष्टया रस्ते चढउताराचे असल्याचे कारण देत नकार दिला आहे. त्यामुळे पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केल्याने पोलादपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना निविदा धारकाने 1 एप्रिललाच ’एप्रिलफुल’ केल्याचे आता उघडकीस आले आहे.
तालुक्यातील 95 गावांतील 233 वाडयांमध्ये पाणी टंचाई सुरू झाल्याने टंचाई निवारण आराखडयामध्ये 1 कोटी 79 लाख 95 हजार रूपये अंदाजे खर्चाच्या एकूण 328 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात 28 गावे 61 वाडयांतील विहिरींतील गाळ उपसा करून खोल करण्याचे 61 लाख 20 हजार रूपयांचे 89 प्रस्ताव आहेत. 45 गावे 106 वाडयांसाठी 30 लाख 20 हजारांचे टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव आहेत. 7 गावे आणि 2 वाडयांतील 9 नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरूस्ती करण्याकामी 45 लाखांचा प्रस्ताव करण्यात आला आहे. विहिरींच्या दुरूस्तीचे 2 गावे 9 वाडयांमध्ये 11 उपाययोजना 2 लाख 75 हजारांसाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधनविहिरी घेण्याचा 13 गावे आणि 55 वाडयांमध्ये 68 ठिकाणी 40 लाख 80 हजारांचा प्रस्ताव करण्यात आला आहे. या टंचाईनिवारण आराखडयामुळे यंदाचा पाणीटंचाई निवारण आराखडा विक्रमी 1 कोटी 79 लाख 95 हजार रूपये अंदाजे खर्चाचा झाला असून यापैकी काही टंचाईनिवारणाची कामे आधीच सुरू केली आहेत. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन तातडीने नवीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा निविदा धारक तातडीने अधिग्रहित केला नाही तर आगामी काळात राजकीय इच्छाशक्तीला संधी मिळून पक्षनिहाय ताकद तालुक्यातील ग्रामपंचायती आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांदरम्यान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.